पनवेल महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा ६ मार्चला
रायगड, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। पनवेल महानगरपालिकाची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा “आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल” येथे पार पडणार असून विविध महत्त्वाच्या व
Panvel Municipal Corporation's first general meeting on March 6


रायगड, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। पनवेल महानगरपालिकाची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा “आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल” येथे पार पडणार असून विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व निर्णय होणार आहेत.

सभेच्या विषयपत्रिकेनुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत स्थायी समितीची रचना करण्यात येणार आहे. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या प्रभागांच्या सार्वत्रिक निवडणुकीतून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी १६ सदस्यांची प्रमाणशीर प्रतिनिधित्वानुसार स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात येणार आहे. स्थायी समिती ही महापालिकेच्या आर्थिक व प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारी समिती मानली जाते.याशिवाय, अधिनियमानुसार महिला व बालकल्याण समितीची सदस्यसंख्या निश्चित करून संबंधित नियमांनुसार सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. महिला व बालविकासाशी निगडित विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी ही समिती कार्यरत राहणार आहे.

तसेच, महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२नुसार सात नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याचाही विषय सभेपुढे ठेवण्यात येणार आहे. महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांनी ही माहिती दिली असून, नव्याने निवडून आलेल्या सभागृहाची ही पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande