
छत्रपती संभाजीनगर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४८५ ग्रामपंचायती ह्या क्षयमुक्त जाहीर झाल्या आहेत. उर्वरीत ३९० ग्रामपंचायतींमध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी येथे दिले.
जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या विविध समित्यांची बैठक पार पडली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा सराफ, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. वैशाली डकले, जिल्हा सांख्यिकी अधिकारी लिपारे, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. सारिका लांडगे, डॉ. जयश्री लहाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बढे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. विनायक मुंडे उपस्थित होते तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामिण रुग्णालयाचे अधिकारी आदी दुरदृष्य प्रणालीने सहभागी झाले होते.
विविध समित्यांचा आढावा जन्म मृत्यू नोंदणी व जीवन विषयक आकडेवारी जिल्हास्तरीय समन्वय समिती, वातावरणीय बदल व मानवी आरोग्य , नियमित लसीकरण, गोवर रुबेला लसीकरण मोहिम, १५ वा वित्त आयोग, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समिती, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम,आपत्कालीन वैद्यकीय सेवा, राष्ट्रीय एड्स निर्मूलन कार्यक्रम, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, रुग्ण कल्याण समिती, बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समिती इ. अशा समितींचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ४ लक्ष ४१ हजार १८१ क्षयरोग प्रवण लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्याद्वारे जिल्ह्यातील ८७५ ग्रामपंचायतींपैकी ४८५ ग्रामपंचायतीत क्षयरोग असलेले लोक आढळले नाहीत. त्यामुळे ह्या ग्रामपंचायती क्षयमुक्त घोषीत झाल्या आहेत. या चाचण्यात संशयित म्हणून जे रुग्ण आढळले आहेत त्यांच्या क्ष किरण व प्रयोगशाळा चाचण्या करुन त्यांना क्षय संसर्ग आहे किंवा नाही हे निदान होईल, असे रुग्ण २४ हजार ३३८ आहेत असे बैठकीत सांगण्यात आले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीतील संशयित रुग्णांच्या प्रयोगशाळा व क्ष किरण चाचण्या करण्यासाठी शासकीय व खाजगी प्रयोगशाळांची मदत घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरावरुन समन्वय साधावा. बाधीत रुग्णांवर उपचार व नंतर पुनर्वसन करुन जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ५ बोगस वैद्यकीय व्यावसायिक आढळले. ही मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिल्या. जिल्ह्यात बोगस डॉक्टर आढळल्यास त्याबाबत नागरिकांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. तक्रार कर्त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल,असेही त्यांनी सांगितले.
जन्म मृत्यू नोंदणी विषयक जिल्हास्तरीय समन्वय समितीस मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, जन्म नोंदींची पडताळणी करावी. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी ही पडताळणी करावी व जिल्हास्तरीय समितीकडे अहवाल सादर करावा,असे निर्देश दिले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis