गाव-खेड्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोहोचवा : रामदास आठवले
लातूर, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)। केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ गाव-खेड्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना रामदास आठवले यांनी दिल्या. लातूर येथील शासकीय विश्रामगृह
रामदास आठवले


लातूर, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)। केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ गाव-खेड्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना रामदास आठवले यांनी दिल्या. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिका आयुक्त मानसी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे, समाज कल्याण सहायक आयुक्त यादवराव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी आदी उपस्थित होते.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी करिअरविषयक मार्गदर्शन द्यावे. तसेच स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे, असे आठवले यांनी सांगितले. केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

‘सर्वांसाठी घरे’ उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत त्यांनी झोपडपट्टी भागात मोहीम राबवून पात्र नागरिकांना कच्च्या घरांच्या जागी पक्की घरे उपलब्ध करून द्यावीत, असे सांगितले. लातूर शहरातील विलासनगर व कॉईल नगर परिसरात सुमारे ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना पक्की घरे देण्यासाठी महानगरपालिकेने आराखडा तयार करावा, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, शासन सेवेत अनुसूचित जाती प्रवर्गातील रिक्त पदे, आंतरजातीय विवाह योजना, वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना तसेच मुद्रा योजनेचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, मनपा आयुक्त मानसी, समाज कल्याण सहायक आयुक्त यादवराव गायकवाड व जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande