
मुंबई, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्याखाली अटकेत असलेला आरोपी पुणे येथील ससून रुग्णालयातून पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याचा आदेश गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे. येत्या ६ महिन्यांत रुग्णालयांचे ‘सेफ्टी ऑडिट’ पूर्ण करण्यात येईल, असे योगेश कदम यांनी सांगितले. काँग्रेसचे आमदार हारून खान यांनी रुग्णालयातून आरोपी पळून जात असल्याविषयी उपाययोजना करण्यात यावी, याविषयीचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता.
१९ फेब्रुवारी आरोपी रुग्णालयातून पळून गेला. रुग्णालयाला रंग देण्यासाठी लावण्यात आलेल्या बांबूवर चढून आरोपी पळाला. या प्रकरणातील दोषी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तसेच विभागीय अन्वेषण चालू आहे. आरोपींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये नेल्यास त्याविषयीची नियमावली सिद्ध करण्यात आली असून सर्व रुग्णालयांना वितरीत करण्यात आली आहे. रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट झाल्यावर आरोपींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ते पालट करण्यात येतील, असे यावेळी योगेश कदम यांनी सांगितले.
नवीन कारागृहांमध्ये वैद्यकीय सुविधा कारागृहातच !
आरोपींना न्यायालयात नेतांना त्यावर मोठ्या प्रमाणात व्यय केला जातो. या वेळी आरोपींना दूरभाष पुरवणे चैनीच्या वस्तू देणे, नातेवाईकांशी बोलू देणे, असे प्रकार सर्रासपणे चाचतात. याविषयी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आमदार हरिश पिंपळे यांनी केली. यावर योगेश कदम म्हणाले, ‘‘रुग्णांना कारागृहात न्यायला लागू नये, यासाठी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ द्वारे सुनावणी घेण्यात येत आहेत. येत्या १ ते दीड वर्षात राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ‘व्हिडिओ फॉन्फरस’ ची सुविधा देण्यात येईल.’’
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी