
पुणे, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।
“पत्रकारांनी बदलत्या काळानुसार तंत्रस्नेही होणे ही आजची अत्यावश्यक गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे पत्रकारांच्या नोकऱ्यांसाठी धोका नसून त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि गती वाढवणारे प्रभावी साधन आहे. बातमीसाठी आवश्यक माहिती संकलन,विश्लेषण आणि संशोधन प्रक्रिया एआयमुळे अधिक वेगवान झाली आहे. मात्र,एआयचा वापर करताना संबंधित वाचकवर्ग लक्षात घेऊन योग्य प्रॉम्प्ट तयार करणे आणि प्राप्त माहितीची पडताळणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत पत्रकारांनी एआयचा प्रभावी वापर केल्यास त्यांची बातमी अधिक नेमकी,विश्वसनीय आणि वेगळी ठरू शकते,”असे प्रतिपादन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या माध्यम व जनसंज्ञापन विभागाचे उपसंचालक प्रा. सुशोभन पाटणकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे,आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या विशेष उपस्थितीत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. “पत्रकारिता क्षेत्रात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा उपयोग” या विषयावर सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या माध्यम व जनसंज्ञापन विभागाचे उपसंचालक प्रा. सुशोभन पाटणकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी ते बोलत होते.
या व्याख्यानादरम्यान विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड,ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार,अविनाश चिलेकर,नंदकुमार सातुर्डेकर हे विचारपीठावर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु