
सोलापूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील डान्सबारची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेमध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी शहरासह ग्रामीण भागातील अवैध डान्सबार व ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकाराचा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.
शहरात स्थानिक पोलिसांच्या संरक्षणाखाली काही ठिकाणी डान्सबार सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण डान्सबार कसे चालतात, याबाबतचा व्हिडिओ पोलिस आयुक्तांना पाठवला.त्यानंतर तेथे पोलिस अधिकारी गेले. मात्र, कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्याबाबतचा पुरावाही उपलब्ध आहे. तसेच कंदलगाव (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातही डान्सबार सुरू आहेत. त्यावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, सरकारने न्यायालयाच्या निर्देश व नियमानुसार सोलापूरसह राज्यभरात ऑर्केस्ट्रा बारला परवाने दिले आहेत.तेथे नियमांची पायमल्ली करून वेगळे प्रकार घडत असतील तर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तीनवेळा असे प्रकार आढळल्यास त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. तसेच कंदलगाव परिसरातील डान्सबारची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड