
मुंबई, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - कुंभमेळा ही आपली संस्कृती आणि महाराष्ट्र धर्म आहे. तो आपण जोपासायला हवा. एका महाकुंभपर्वामुळे उत्तरप्रदेशाचा ठसा संपूर्ण जगात उमटला. त्याप्रमाणे नाशिक येथील सिंहस्थ कुंभपर्वाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा ठसा जगात उमटवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सिंहस्थ कुंभपर्वाच्या निमित्ताने नाशिक येथे चालू असलेल्या विकासकामांवर महाविकास आघाडीकडून होत असलेल्या टिकेला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या ठरावाच्या वेळी उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘कुंभमेळा हा प्रती साडेबारा वर्षांनी येतो. हा सांस्कृतिक जागतिक वारसा आहे. जगात अशा प्रकारे अन्य कोणताही मेळावा होत नाही. कुंभमेळ्यामध्ये कुणीही कुणाला जात विचारत नाही. सर्व पथ, जातीचे कुंभमेळ्यात येतात. अन्य धर्मीय कुंभमेळ्यामध्ये सहभागी होतात. दुसर्या पद्धतीने पाहिले, तर प्रयागराजमध्ये उत्तरप्रदेश महाकुंभपर्वासाठी जेवढी गुंतवणूक केली, त्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांना परतावा मिळाला. नाशिक कुंभपर्वाच्या निमित्ताने गोदावरी स्वच्छ करण्यासाठी, विकास आराखडा सिद्ध करणे, रस्त्याचे रूंदीकरण, विमानतळ सिद्ध करणे या तात्काळ सुविधा नाहीत, तर या सुविधा भविष्यातही उपयोगी पडणार्या आहेत. यामुळे धार्मिक पर्यटनही वाढेल.’’
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी