
रत्नागिरी, 26 फेब्रुवारी, (हिं. स.) : येथील टिळक आळी भगिनी मंडळातर्फे रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला.भगिनी मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी हा सत्कार करण्यात आला. मंडळाला शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन सौ. सुर्वे यांनी यावेळी दिले.
शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळात यावर्षी पाककला स्पर्धा घेण्यात आली. पनीर घालून गोड पदार्थ आणि चणाडाळ वापरून तिखट पदार्थ करणे अशी स्पर्धा होती. ताटाभोवती पानाफुलांची रांगोळी हा कलाकुसरीचा स्पर्धेचा विषय होता. पनीरपासून गोड पदार्थ बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम ऋचा जोग, द्वितीय वैशाली जोशी आणि चणाडाळीपासून तिखट पदार्थ स्पर्धेत प्रथम कल्याणी पटवर्धन, द्वितीय वैशाली जोशी, ताटाभोवती पानाफुलांची रांगोळी स्पर्धेत प्रथम ऋचा जोग व द्वितीय दया भिडे यांनी क्रमांक पटकावला. या तिन्ही स्पर्धांना सौ. उल्का पटवर्धन, सौ. श्वेता शितूत आणि सौ. सुषमा दिवेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्यांना सौ. सुर्वे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी