
* प्रशासकीय दिरंगाई आणि तक्रार नोंदवण्यातील टाळाटाळ यांविषयी संताप व्यक्त !
मुंबई, 26 फेब्रुवारी (हिं.स.) – ‘राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा विमान अपघात ही केवळ दुर्घटना आहे की घातपात, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संभ्रमाचे आणि संशयाचे वातावरण आहे. या प्रकरणी राजकारण करायचे नाही; मात्र सत्य बाहेर आलेच पाहिजे. अन्यथा बारामतीपासून चालू झालेले आंदोलनाचे लोण संपूर्ण राज्यात पसरेल’, असा स्पष्ट इशारा शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत दिला. नियम ९३ अन्वये उपस्थित केलेल्या सूचनेद्वारे त्यांनी या गंभीर प्रकरणाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
शशिकांत शिंदे म्हणाले की, या अपघात प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १७३ (१) नुसार गंभीर घटनेची तक्रार नोंदवणे बंधनकारक आहे. असे असतांनाही अद्याप अधिकृत गुन्हा का नोंदवला गेला नाही ? राज्याच्या प्रमुखाच्या संदर्भातील घटनेत एवढी अनास्था असणे हे दुर्दैवी आहे. विमान प्रवासात पालटलेले दोन्ही वैमानिक सध्या कुठे आहेत ? त्यांची चौकशी करण्यात आली आहे का? ‘ब्लॅक बॉक्स’ सुरक्षित असल्याचे सांगितले जाते, मग त्यातील निष्कर्ष जनतेसमोर का आणले जात नाहीत?
ते म्हणाले की, ‘डीजीसीए’ने (नागरी विमान वाहतूक संचालनालय) ‘व्ही.एस्.आर्.’ आस्थापनाच्या विमानांवर बंदी घातली आहे; मात्र केवळ बंदी घालून दायित्वातून सुटका होऊ शकत नाही. या खासगी आस्थापनातील गुंतवणूकदार कोण आहेत आणि त्यांना अनुमती देतांना नियमांचे उल्लंघन झाले आहे का ? याचीही चौकशी व्हायला हवी. या प्रकरणी ‘सीआयडी’ चौकशीची भूमिका मांडली जात असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ‘सीबीआय’ चौकशीची मागणी केली आहे. आमदार रोहित पवार यांनीही याविषयी देहलीत सादरीकरण करून संशय व्यक्त केला आहे.
या वेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून जनतेच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे शासनाने तातडीने अधिकृत निवेदन करून वस्तुस्थिती मांडावी, असे निर्देश दिले. विरोधकांनी यावर सविस्तर चर्चेची मागणी केल्यावर या विषयावर अल्पकालीन चर्चा घेतली जाईल, असे सभापतींनी जाहीर केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी