
जळगाव, 26 फेब्रुवारी (हिं.स.) नवी मुंबई येथील खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी 'हिंद दी चादर श्रीगुरु तेग बहादूर साहिब जी यांचा 350 व्या शहिदी समागम कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या नियोजन संदर्भात पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी श्री घुगे म्हणाले, हिंद दी चादर या कार्यक्रमाची विविध उपक्रमांच्या माध्यमातून जिल्हयात व्यापक प्रचार व प्रसिध्दी होत आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त भाविकांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा, तसेच जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यांनी केले. नवी मुंबई खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या देशव्यापी भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजन व पुर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते दूरदृष्य प्रणाली बोलत होते.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, मनपा अति.आयुक्त श्रीमती शोभा बाविस्कर, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राहूल इधे, कार्यक्रमाचे राज्य समिती समन्वयक श्रावण चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.घुगे म्हणाले, नवी मुंबई खारघर येथे कार्यक्रमास जिल्हयातील विविध तालुक्यातून, गावातून भाविकांना कार्यक्रमास जाण्यासाठी व परत येण्याची व्यवस्थेचे सुसूत्र नियोजन करण्यात येत असल्याचे सांगून ते म्हणाले, तालुकास्तरावरुन विविध सामाजीक संघटनांच्या मदतीने बसेसची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी बैठकीत नमूद केले.
कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार प्रसिद्धीसाठी प्रशासनामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जळगाव शहरात तसेच तालुकास्तरावर कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिध्दीसाठी चित्ररथ, हार्डिगव्दारे जनजागृती सुरू आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.देशातून तसेच राज्यातून अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सर्व सेवाभावी संस्था, युवक-युवती व विविध समाज घटकांनी पुढाकार घेऊन एकत्रितपणे काम केल्यास हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास यांनी यावेळी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर