
मुंबई, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र आतिश दांडेगावकर यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. नवी मुंबई इथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला आमदार तान्हाजी मुटकुळे, प्रज्ञा सातव, जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, किशोर देशमुख, माजी आमदार रामराव वडकुते, अंकुश आहेर, फुलाजीराव शिंदे, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आदी उपस्थित होते. सहकारक्षेत्रात काम करणारे उमदे नेतृत्व दांडेगावकर यांच्या भाजपाप्रवेशामुळे आता ‘आतिश’ पर्व सुरू झाले आहे या शब्दांत श्री. चव्हाण यांनी कौतुक केले. श्री. आतिश हे कपिश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि महाराष्ट्राचा वेगाने विकास होत आहे. सर्व समाजघटकांचा विकास आणि प्रगती करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. या दोघांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर विश्वास ठेवून आज श्री. दांडेगावकर यांच्यासोबत त्यांच्या असंख्य समर्थकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या परिसरात पिकणा-या पिकांतून या परिसराचा विकास आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी काय करता येईल ही जबाबदारी आता श्री. दांडेगावकर यांच्यावर सोपवत असल्याचेही ते म्हणाले. या सर्वांच्या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात भाजपा संघटनेला अधिक बळकटी मिळेल. या सर्वांनी जो विश्वास भाजपावर ठेवला आहे त्या विश्वासास पात्र ठरू आणि सर्वांचा पक्षात उचित सन्मान राखला जाईल अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली.
श्री. दांडेगावकर म्हणाले की, देशाचा आणि राज्याचा सर्वसमावेशक विकास हा एनडीए आणि भाजपा महायुती सरकारच करू शकते म्हणूनच विकासकार्यात सहभागी होण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
श्री. दांडेगावकर यांच्या सोबत भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये वसमत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) वसमत तालुका अध्यक्ष दौलत हुंबाड, औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष रमेश सानप, जिल्हा सरचिटणीस गणेश कमळू, महिला राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस रत्नमाला शिंदे, युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील मुळे, पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव इंगोले, राम झुंझुर्डे, माजी संचालक अमोल मुळे आदींचा समावेश आहे. वसमत चे माजी नगराध्यक्ष व काँग्रेस नेते विजय कडतन यांनीही भाजपात प्रवेश केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर