
जळगाव, 27 फेब्रुवारी (हिं.स.) : राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू असताना रावेर तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर घडलेल्या प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. भरारी पथकाने जीवशास्त्राच्या पेपरदरम्यान तब्बल ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, अवघ्या अडीच तासांत प्रसिद्ध झालेल्या नाशिक बोर्डाच्या सुधारित अहवालात जळगाव जिल्ह्यात एकही कॉपी प्रकरण ‘निरंक’ दाखवण्यात आले आहे. त्यामुळे पकडलेल्या विद्यार्थ्यांची नोंद नेमकी कुठे आणि कशी गायब झाली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मीनल करणवाल यांनी संबंधित केंद्र संचालकांकडून लेखी खुलासा मागविला आहे. सीईओंनी स्पष्ट केले की, माहिती वरिष्ठांकडे का पाठवली गेली नाही आणि अहवालात ‘निरंक’ नोंद कशी झाली, याबाबत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.माहितीनुसार, रावेर येथील सरदार जी. जी. महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने तपासणीदरम्यान ११ विद्यार्थ्यांविरुद्ध कॉपी प्रकरणी कारवाई पूर्ण केली. संबंधित कागदपत्रे केंद्र संचालकांकडे सुपूर्द करण्यात आली होती, आणि नियमानुसार ही माहिती तत्काळ बोर्डाकडे पाठविणे अपेक्षित होते.शिक्षण क्षेत्रात या प्रकारामुळे सतर्कता वाढली असून, आता प्रशासन या गफलतीची मूळ कारणे शोधून यथोचित निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर