परभणी : प्रलंबित मागण्यांसाठी अभाविपचा ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने परभणीत जोरदार ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून त
परभणी : प्रलंबित मागण्यांसाठी अभाविपचा ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’


परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने परभणीत जोरदार ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रवेश प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, शिष्यवृत्ती वितरण, शुल्कवाढ, वसतिगृह व वाहतूक सुविधा तसेच शैक्षणिक गुणवत्तेबाबत तात्काळ निर्णय घ्यावेत, अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्यात यावी, वाढीव परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने वितरित कराव्यात, इंटर्न व रेसिडेंट डॉक्टरांचे स्टायपेंड वाढविण्यात यावे, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत लवकर पूर्ण करावी, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे व शहर मंत्री सेजल मंत्री यांच्यावतीने आपल्या मागण्या संदर्भातील एक तपशीलवार निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. त्याद्वारे, अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांचे शुल्क पूर्णपणे माफ करावे व सर्व स्पर्धा परीक्षांचे वाढीव शुल्क तात्काळ कमी करावे. मुलींच्या मोफत शिक्षण योजनेची अंमलबजावणी शासन परिपत्रकानुसार काटेकोरपणे करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ मधील प्रवेश, परीक्षा व निकालासंदर्भातील समस्या तात्काळ सोडवाव्यात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील रिक्त प्राध्यापक पदे त्वरित भरावीत आणि परीक्षा शुल्क कमी करावे. डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना यांसह सर्व प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग कराव्यात. इंटर्न व रेसिडेंट डॉक्टरांचे स्टायपेंड वाढवावे. आयटीआय महाविद्यालयांमध्ये अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून नवीन इमारती उभाराव्यात तसेच विद्यार्थ्यांचा भत्ता वेळेत जमा करावा. परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत तात्काळ पूर्ण करून सुरू करावी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील रिक्त पदे त्वरित भरावीत. महाविद्यालयीन खुल्या विद्यार्थी निवडणुका महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 नुसार सुरू कराव्यात. एमएच-सीईटी प्रवेश प्रक्रिया सुलभ, कालबद्ध व पारदर्शक करावी. अकरावी प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक सुधारणा करून वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. मराठी माध्यमांच्या शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात. ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी. पशुवैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अंतनिर्वाह भत्ता व अधिछात्रवृत्ती सुरू करावी. परभणी येथे शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, परभणी येथे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी तात्काळ स्वतंत्र जागा व इमारत उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande