
नाशिक, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।.
- येथे सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलनाच्या झगमगाटामागील सरकारचा दुटप्पीपणा उघड करणारे पत्रक वाटप केल्याबद्दल ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) च्या राज्यसहसचिव प्राजक्ता कापडणे, राज्य परिषद सदस्य तल्हा शेख , हर्षाली अडांगे, मुक्ता अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. या दडपशाही कारवाईचा AISF तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे..
याबाबत भाकपचे नेते राजू देसले यांनी सांगितले की, एकीकडे राज्य शासन कमी पटसंख्येचा बहाणा करत हजारो सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेते, तर दुसरीकडे “मराठी अभिमान”च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा उत्सव साजरा करते. हा अभिमान नाही — हा ढोंगीपणा आहे! AISF कार्यकर्त्यांनी संमेलनस्थळी शांततामय पद्धतीने पत्रक वाटप करत केवळ एवढाच प्रश्न विचारला की, मराठीचा सन्मान मंचावर की शाळांमध्ये? यावर उत्तर देण्यापेक्षा दडपशाही करण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेधही त्यांनी व्यक्त केला आहे.
सरकारी मराठी शाळांमध्ये शिकणारी मुले ही प्रामुख्याने कष्टकरी, शेतमजूर, आदिवासी, बहुजन समाजातील आहेत. या मुलांच्या शिक्षणाचा गळा घोटून “मराठी प्रेम”ाचा दिखावा करणे म्हणजे सामाजिक न्यायाच्या संकल्पनेलाच हरताळ फासणे होय. विद्यार्थ्यांनी आवाज उठवला म्हणून त्यांना अटक करणे हे लोकशाहीला काळीमा फासणारे कृत्य आहे. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केल्याबद्दल विद्यार्थ्यांना गुन्हेगार ठरवले जात असेल, तर हा लोकशाही नव्हे तर दडपशाहीचा मार्ग आहे.
AISF स्पष्ट सांगू इच्छितो की, विद्यार्थ्यांचा आवाज पोलिसी कारवाईने दाबता येणार नाही. मराठी शाळा वाचवण्याचा लढा अधिक तीव्र केला जाईल. आज घडलेल्या घटनेवरून सरकार ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या आंदोलनाला पूर्णपणे घाबरलेली आहे आणि फडणवीसचे पूर्ण पितळ उघडे झाले आहे. ज्या पद्धतीने पोलिसांचा वापर करून दडपशाही केली जात आहे, त्यावरून हे सत्तेमध्ये बसलेले मनुवादी देवेंद्र फडणवीस, दादा भुसे फक्त आणि फक्त कॉर्पोरेटची दलालीच करतात आणि मराठी भाषेचा प्रेम जपत असल्याच्या ढोंग करतात. करोडो रुपये कार्यक्रमांवर खर्च करून कमिशन खोरी करण्याचे काम हे सरकार करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV