
अकोला, 27 फेब्रुवारी (हिं.स.) :अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक वीज केंद्र अंतर्गत राखड (फ्लाय ॲश) वितरण विभागात गंभीर गैरव्यवहार झाल्याची तक्रार समोर आली आहे. अंदुरा येथील उमेश प्रल्हादराव जाधव यांनी 17 फेब्रुवारी 2026 रोजी अकोला जिल्हा खनिज कर्म विभागाकडे याबाबत लेखी अर्ज सादर केला आहे.
तक्रारीनुसार, बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रकल्पग्रस्त नसतानाही काही व्यक्तींना तसेच एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांच्या नावावर 20 टक्के सवलतीच्या दरात फ्लाय ॲश व पाँड ॲशचे वितरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक, दस्तऐवजांची अफरातफर, संगनमत तसेच शासकीय महसूल बुडाल्याचा ठपका तक्रारीत ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी स्वतंत्र चौकशी समिती गठित करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच महाराष्ट्र वित्तीय नियम 1959 मधील नियम 53 परिशिष्ट 20 नुसार संबंधितांकडून रकमेची वसुली करण्यात यावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित अर्जाची दखल घेऊन नियमानुसार चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना पारस औष्णिक वीज प्रकल्पाच्या मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.
----------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे