
- बेसा हाऊसिंग सोसायटीमधील गैरव्यवहाराचे प्रकरण
- सहकारमंत्र्यांनी केली विधानसभेत निलंबनाची घोषणा
मुंबई, 27 फेब्रुवारी (हिं.स.) : नागपूरच्या बेसा नगरपंचायत हद्दीतील आनंद को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी सहायक निबंधकाला निलंबित करण्याची घोषणा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
नागपूरच्या बेसा नगरपंचायती अंतर्गत येणाऱ्या आनंद को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सचिव कैलास चूटे यांनी सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेली 11 हजार 107 चौरस फूट जागा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संस्थेचे सदस्य नसलेल्या व्यक्तींना विकल्याचा आरोप आहे. या संदर्भात धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.प्रश्नाला उत्तर देताना सहकार मंत्र्यांनी प्राथमिक चौकशीत गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील दोषी शासकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून नंतर चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यानंतर सहकार मंत्र्यांनी सहायक निबंधकाला निलंबित करण्याची घोषणा केली. तसेच, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही प्रथमदर्शनी सहभाग असल्याचे आढळत असल्याने त्यांच्या चौकशीसंदर्भात प्रकरण नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.या संपूर्ण प्रकरणाची एका महिन्यात चौकशी पूर्ण करून संबंधितांवर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहात देण्यात आले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी