
चंद्रपूर, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।
जिल्ह्याची आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या माता महाकाली यात्रेला १९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यासंदर्भात करावयाच्या नियोजनाबाबत महापौर संगीता खांडेकर यांनी मनपा मुख्यालयात आढावा घेतला.त्याआधी त्यांनी प्रत्यक्ष यात्रा परिसरात जाऊन पाहणी केली.
याप्रसंगी उपमहापौर प्रशांत दानव,आयुक्त अकुनुरी नरेश, उपायुक्त संदीप चिद्रवार,उपायुक्त शेषराव टाले, मुख्य लेखाधिकारी मनोज गोस्वामी, शहर अभियंता रवींद्र हजारे, सहायक आयुक्त अनिलकुमार घुले, उपअभियंता रवींद्र कळंबे, प्रगती भुरे तसेच मनपाचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
महाकाली यात्रेला विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात, असे सांगून महापौर म्हणाल्या, गर्दी व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन प्रशासनाने करावे. भाविकांचा प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. पाणीपुरवठा विभागाने भाविकांना पिण्यासाठी पाण्याच्या टाक्या व पाण्याचे टँकर सज्ज ठेवावे. आरोग्य विभागाने निःशुल्क प्रथोमपचार वैद्यकीय सेवा तसेच २४ तास रुग्णवाहिका व अग्निशमन सेवा उपलब्ध ठेवावी.
उन्हाचा तडाखा लक्षात घेता बाहेरून येणा-या भाविकांना उष्माघात बाबत घ्यावयाची काळजीची माहिती द्यावी. विद्युत विभागाने संपूर्ण परिसरात विदयुत व्यवस्था उभारावी तसेच,यात्रेवर लक्ष ठेवण्यास सीसीटीव्ही लावण्याचे काम करून घ्यावे. शिक्षण विभागाने वादळ,वारा,पाऊस अशी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास नागरीकांना स्थलांतरीत करण्याकरीता मनपाच्या शाळा व इतर ठिकाणे राखीव ठेवावी.
यात्रा मैदान येथे व मनपा स्वच्छता झोन इमारत अश्या २ जागी नियंत्रण कक्ष स्थापन करावा.बांधकाम विभागाने काही दुरुस्तीची कामे असल्यास आताच करून परिसरातील रस्ते व्यवस्थीत आहेत याची खात्री करून घ्यावी. स्वच्छता विभागाने मंदिर व यात्रा परिसर नियमित स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी,भाविकांसाठी पक्के शौचालय व फिरत्या शौचालयांची व्यवस्था ठेवावी.
भाविकांना वाहने ठेवण्यास वाहनतळाच्या जागा निश्चित करून घ्या व तसे फलक वेळेत लागतील याची काळजी घ्या. मदतीसाठी दुरध्वनी क्रमांक जाहीर करून प्रत्येक फलकावर त्यांची नोंद असावी. यात्रेकरू महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारावा तसेच कपडे बदलण्यासाठी व आंघोळीसाठी खोल्यांची व्यवस्था करण्याचेही निर्देश त्यांनी प्रसंगी दिले.
याप्रसंगी उपमहापौरांनी बरेचसे भाविक पठाणपुरा बाहेरील ईरई नदीवर आंघोळीसाठी जातात,तेव्हा त्यांच्यासाठी तिकडेच स्नानाची तसेच राहण्याची व्यवस्था करता येईल का? हे तपासण्यास सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव