
धुळे, 27 फेब्रुवारी (हिं.स.) : नाशिक येथे ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रात हवाई संपर्काबाबत महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे. देशभरातून तसेच परदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर मोठा ताण येण्याची चिन्हे आहेत.
याच पार्श्वभूमीवर धुळे येथील गोंदूर विमानतळावरून प्रादेशिक संपर्क योजनेअंतर्गत धुळे-मुंबई आणि धुळे-पुणे या मार्गांवर नियमित विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. इंडिगो कंपनीच्या ग्राहक अनुभागाकडून संबंधित विभागाकडे प्राथमिक परीक्षणासाठी प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीकडून सध्या अंतर्गत आढावा सुरू असल्याचे कळते. धुळे येथील उद्योगपती जयेश बाफना यांनी या संदर्भात इंडिगोकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. सिंहस्थ काळात धुळे हे पूरक विमानतळ म्हणून विकसित होऊ शकते आणि त्यामुळे नाशिकवरील प्रवासी ताण कमी होईल, असा दावा त्यांनी प्रस्तावातून मांडला आहे. नाशिकपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर असलेले धुळे राष्ट्रीय महामार्गाने थेट जोडलेले आहे, ही बाबही प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे. धुळे-मुंबई आणि धुळे-पुणे मार्गांवर दररोज सुमारे 300 बस फेऱ्या सुरू असून, उच्च भाडे असूनही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा उल्लेख प्रस्तावात आहे. यावरून हवाई सेवेची दडलेली मागणी स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. वेळेची बचत, सुरक्षितता आणि सोयीस्कर प्रवासासाठी प्रवासी अधिक भाडे देण्यासही तयार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. राज्यस्तरावर धुळे विमानतळ कार्यान्वित करण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू असल्याचे संकेत अलीकडील घडामोडींमधून मिळत आहेत. प्रस्तावास मान्यता मिळाल्यास सिंहस्थ मेळ्याच्या काळात धुळे पूरक विमानतळ ठरू शकते. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील हवाई संपर्काला नवे दालन खुले होण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर