
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।
सुंदर संस्कृती आणि सुसंस्कारित माणूस घडविण्याचे महान कार्य आपल्या अध्यात्मपरंपरेने केले आहे. ‘देह हेच मंदिर’ याचे भान देणारी ज्ञानेश्वरी ही जीवन उद्धाराची संजीवनी आहे, असे प्रतिपादन निवृत्त जिल्हाधिकारी विजयकुमार फड यांनी केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलाच्या वतीने आणि देवगिरी नागरी सहकारी बँक लि., छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रायोजकत्वाखाली सेलू शहरातील नूतन विद्यालयाच्या सभागृहात आयोजित स्व. जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेच्या ‘समग्र ज्ञानेश्वरी माऊली’ या विषयावर गुंफण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आनंद गुजर, हरिभाऊ चौधरी, उपेंद्र बेलुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना फड म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ज्ञानेश्वरीचे वाचन म्हणजे स्वतःला जाणण्याचा आणि आत्मपरीक्षणाचा मार्ग होय. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द हा जीवनाला दिशा देणारा आणि अंतःकरण शुद्ध करणारा आहे. ज्ञानेश्वरीचे नियमित वाचन केल्यास मनातील संभ्रम, भीती आणि नकारात्मकता दूर होते. त्यामुळे माणसाच्या हातून चुकीचे काही घडत नाही. म्हणूनच ज्ञानेश्वरी अंतःकरणपूर्वक वाचली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. समाजाला सुसंस्कारांची दिशा देण्याचे महान कार्य माउलींनी केले आहे. संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई या संतभावंडांचा आदर्श समाजाने घेतला, तर कौटुंबिक आणि सामाजिक कलह आपोआप कमी होतील. एवढेच नव्हे, तर देशातील अनेक वाद-विवाद आणि न्यायालयीन प्रकरणांची संख्या देखील घटेल, असे त्यांनी नमूद केले.
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis