
अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.)
सन २०२४-२५ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील चार ग्रामपंचायती विभागस्तरावर विजयी झाल्या असून त्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी रुपयांची बक्षीसे प्राप्त झाली आहेत.
उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल एरणगावच्या सरपंच माया राजीव घोडे व सचिव ज्योत्स्ना इसळ, पार्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा प्रवीण वानखडे व सचिव अनुराधा नरेंद्र विधळे, ग्रामपंचायत जरूडचे प्रशासक तथा विस्तार अधिकारी नितीन सुपले व सचिव संजय श्रीकृष्ण दांदळे तसेच ग्रामपंचायत लोणीच्या सरपंच अश्विनी दवंडे व सचिव प्रशांत वानखडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या हस्ते आज, गुरुवारी दुपारी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्यासह डेप्युटी सीईओ (सामान्य प्रशासन) श्रीराम कुलकर्णी, सहायक बीडीओ सुनील गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एरणगाव, वरुड तालुक्यातील जरूड व लोणी आणि मोर्शी तालुक्यातील पार्डी ह्या त्या चार ग्रामपंचायती आहेत. माझी वसुंधरा अभियानांतर्गत या ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाच्यादृष्टीने पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर आधारित विविध निकषांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल या ग्रामपंचायतींना सदर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. निवड करण्यासाठी राज्यस्तरीय तज्ज्ञ समिती ठिकठिकाणी गेली होती. त्यांच्या अहवालानंतरच सदर ग्रामपंचायतींची अंतीम निवड करण्यात आली.
इतर ग्रापंसाठी प्रेरणादायी सदर पुरस्कार हा विजेत्या ग्रामपंचायतींसाठी तर गौरवाची बाब आहेच, जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठीही तो प्रेरणादायी आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांनीही या स्पर्धेत यश प्राप्त करुन पुरस्कार मिळवावे, असा संदेश यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र यांनी दिला. ज्या ग्रामपंचायतींनी पुरस्कार जिंकले, तेथील पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे कौतुक करतानाच त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे त्यांनी अभिनंदनही केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी