मोर्शी येथे तुरीच्या भावावरून शेतकरी संतप्त
अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर गुरुवारी साप्ताहिक बाजार भरतो. गुरुवार रोजी भरलेल्या बाजारात तूर खरेदी-विक्रीच्या कारणावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या महिनाभरापासून तुरीचे भाव अचानक घसरल्यामुळ
तुरीच्या भावावरून शेतकरी संतप्त मोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत काही काळ तणाव


अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर गुरुवारी साप्ताहिक बाजार भरतो. गुरुवार रोजी भरलेल्या बाजारात तूर खरेदी-विक्रीच्या कारणावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या महिनाभरापासून तुरीचे भाव अचानक घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांचा संताप उफाळून येत असल्याचे चित्र आहे.

बेलोरा येथील शेतकरी पंकज विघ्नेश यांनी दहा कट्टे तूर विक्रीसाठी बाजार समितीत आणली होती. त्यांनी आपली तूर अडते साधना लढ्ढा यांच्याकडे लीलावासाठी टाकली. मात्र हर्रास (लिलाव) सुरू असताना अपेक्षेपेक्षा अत्यल्प दर मिळत असल्याचे लक्षात येताच संबंधित शेतकऱ्याचा संताप अनावर झाला. दर कमी मिळत असल्याचा निषेध नोंदविण्यासाठी त्यांनी व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले. त्यावेळी एका व्यापाऱ्याने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेमुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आणि बाजार समिती परिसरात एकच गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन काही काळ हर्रास प्रक्रिया तात्पुरती बंद ठेवण्यात आली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्पादन खर्च वाढलेला असताना तुरीला अत्यल्प दर मिळत असल्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत मोबाईल हिसकावून घेण्यासारखे प्रकार घडणे अयोग्य असून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, एका व्यापाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे तुरीचे दर घसरले आहेत. अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारानुसार आयात शुल्कात कपात व निर्यातीवरील शुल्कवाढ याचा परिणाम देशांतर्गत बाजारभावांवर होत असल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व घडामोडींमुळे काही काळ बाजार समितीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी व व्यापारी यांच्यात समन्वय राखून प्रश्न सोडविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande