
प्रयागराज, 27 फेब्रुवारी (हिं.स.) : बालकांच्या लैगिक शोषणाशी संबंधित पॉक्सो प्रकरणात स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि त्यांचे साथीदार स्वामी प्रत्यकचैतन्य मुकुंदगिरी यांना अलाहबाद हायकोर्टातून दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने या दोघांच्या अटकेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. तसेच त्यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावरील निर्णय देखील राखून ठेवला आहे. अलाहबाद उच्च न्यायालयात आज, शुक्रवारी सुमारे एक तासाहून अधिक काळ चाललेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्ती जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या एकलपीठाने हा आदेश दिला.
विशेष न्यायाधीश (पॉक्सो कायदा) यांच्या आदेशानुसार आशुतोष ब्रह्मचारी यांच्या अर्जावरून मागील रविवारी झूंसी पोलीस ठाण्यात स्वामी अविमुक्तेश्वरानंद व इतरांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी प्राथमिक चौकशी पूर्ण केली असून पीडितांची जबाब नोंदविण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. महाकुंभ 2025 ते माघ मेळा 2026 दरम्यान अल्पवयीन बटुंवर कथित लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप स्वामी अविमुक्तेश्वरानंद व त्यांचे सहकारी स्वामी मुकुंदानंद यांच्यावर आहे.
सुनावणीपूर्वीच न्यायालय कक्ष क्रमांक 72 मध्ये मोठी गर्दी झाली होती. बचाव पक्षाने युक्तिवाद करताना सांगितले की कथित लैंगिक शोषणाच्या घटना मध्य प्रदेश व प्रयागराज येथे घडल्याचे नमूद करण्यात आले आहे, तर पीडित बालके हरदोई येथील नियमित विद्यार्थी आहेत. गुणपत्रिकेनुसार त्यापैकी एक जण प्रौढ आहे व त्याचा आश्रमाशी कोणताही संबंध नाही, असेही बचाव पक्षाने नमूद केले. तसेच तक्रारदार स्वतः विविध गुन्ह्यांत सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला. राज्य सरकारतर्फे अग्रिम जामिनाच्या अर्जाच्या ग्राह्यतेवर आक्षेप घेण्यात आला. तक्रारदारांच्या वकिलांनीही अग्रिम जामिनास विरोध दर्शविला. या प्रकरणातील आदेश मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी