
अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। एआयएमआयएम पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन केल्यावरून नगरसेविका मीरा कांबळे यांच्या अपात्रतेबाबत १७ मार्च रोजी विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होणार आहे. दोन दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
गेल्या ६ फेब्रुवारीला महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान पक्षाने २ फेब्रुवारीलाच तटस्थ राहण्याचा व्हीप जारी केला होता. त्यानंतर निवडणुकीच्या दिवशीसुद्धा पक्षाने व्हीप जारी केला, त्या व्हीपवर नगरसेविका मीरा कांबळे यांनी स्वाक्षरीसुद्धा केली होती. मात्र सभागृहात प्रत्यक्ष मतदान करताना मीरा कांबळे यांनी महापौर श्रीचंद तेजवानी व उपमहापौर सचिन भेंडे यांच्या बाजूने हात उंच करून मतदान केले आणि प्रोसिडिंगवर स्वाक्षरीसुद्धा केली.
कांबळे यांनी भाजप व वायएसपी उमेदवारांना पाठिंबा दिल्याने या भूमिकेमुळे पक्षशिस्त भंग झाल्याचे नमूद करत त्यांच्या नगरसेवक पदाच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. एमआयएमतर्फे अॅड. नासिर शाह यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. त्या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्तांनी सुनावणी निश्चित केली आहे. संबंधित प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून निर्णय दिला जाणार आहे. १७ मार्चच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षाचा असा कुठलाही आदेशच नव्हता
विभागीय आयुक्तांकडून नोटीस प्राप्त झाली आहे. १७ ला सुनावणी असून आम्ही आमची बाजू मांडू. निवडणुकीपर्यंत कुठलाही आदेश मिळाला नव्हता. ज्या कागदपत्रांवर एमआयएमकडून सह्या घेण्यात आल्या. त्यामध्ये पक्ष आदेश किंवा व्हीप असा कुठलाही शब्द नव्हता, तशी माहिती देण्यात आली नव्हती. असे नगरसेविका मीरा कांबळे म्हणाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी