
नवी दिल्ली , 27 फेब्रुवारी (हिं.स.)। अमेरिकन टॅरिफविषयी सुप्रीम कोर्ट ऑफ द युनायटेड स्टेटच्या निर्णयानंतर भारत सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे आणि परिस्थिती सतत बदलत आहे ,असे उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. देशाच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारताचा युनायटेड स्टेट्स प्रशासनाशी सातत्याने संवाद सुरू असून अंतर्गत पातळीवरही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ही परिस्थिती सतत विकसित होत असून घटनाक्रमावर लक्ष ठेवत भारताच्या सर्वोत्तम हितांचे रक्षण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यांनी आश्वासन दिले की भारत अधिक चांगल्या संधींसाठी संवादाची भूमिका कायम ठेवेल आणि जागतिक व्यापारात आपली स्पर्धात्मक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवेल. त्यांनी सांगितले की अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चेचा उद्देश असा करार निश्चित करणे आहे, ज्यामुळे भारताला इतर उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्थांच्या तुलनेत स्पर्धात्मक आघाडी मिळेल आणि राष्ट्रीय हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होतील.
भारताच्या चर्चेतील भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोयल म्हणाले की परिस्थिती अजूनही गतिमान आहे आणि विविध स्तरांवर संवाद सुरू आहे. परिस्थितीत बदल झाल्यास व्यापार करारामध्ये संतुलन (री-बॅलन्स) साधण्याची तरतूदही ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी सूचित केले.टॅरिफ दरांबाबत विचारलेल्या प्रश्नावर मंत्री म्हणाले की जर शुल्क दर १८ टक्क्यांऐवजी १५ टक्के असेल, तर निर्यात कोणत्याही अडथळ्याविना सुरू ठेवण्यास मदत होईल. मात्र, कोणत्याही व्यापार कराराचे मूल्यमापन केवळ टॅरिफच्या आधारे न करता त्यातील व्यापक सकारात्मक पैलू लक्षात घेऊन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
गोयल म्हणाले की आंतरराष्ट्रीय व्यापार तुलनात्मक लाभाच्या तत्त्वावर आधारित असतो. भारताला आपल्या प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत कमी टॅरिफ दर मिळाल्यास ते निर्यातीसाठी मोठे यश ठरेल. त्यांनी नमूद केले की पूर्वी ५० टक्के टॅरिफमुळे भारताला निर्यातीमध्ये मोठा तोटा सहन करावा लागत होता; त्यामुळे तो कमी पातळीवर आणणे भारतासाठी महत्त्वाचा लाभ ठरू शकतो. अंतिम कराराचे संपूर्ण तपशील सध्या उघड करता येणार नाहीत, मात्र त्यात अनेक सकारात्मक बाबी समाविष्ट आहेत. परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत सर्व संबंधित भागधारकांनी संयम बाळगावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode