
बीड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।
महसूल विभागाच्या पाटोदा उपविभागातील आष्टी आणि पाटोदा तालुक्यातील पोलीस पाटलांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांच्या परीक्षा राज्यसेवा परीक्षांच्या धरतीवर घेण्यात आल्या असून परीक्षेमधे पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आणि कागदपत्र पडताळणी १ मार्चपासून सुरू होणार आहे.
पाटोदा आणि तालुक्यातील पोलीस पाटलांच्या २४६ जागा रिक्त आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या पदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात आला. २४६ जागांसाठी दोन हजारावर अर्ज दाखल झाले. नुकत्याच झालेल्या परीक्षांमध्ये ८१९ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. परीक्षा अगदी स्पर्धा परीक्षांच्या धरतीवर घेण्यात आल्या. ३६ पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. एकूण ८१९ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यासाठीची समिती
निश्चित करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी असणार आहेत. तर उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच आष्टी आणि पाटोदा, तहसीलदार, समाज कल्याण विभागाचा एक आणि आदिवासी विकास विभागाचा एक प्रतिनिधी असे सदस्य असणार आहेत. मुलाखत आणि पडताळणी २० गुणांची असणारा असून त्यामध्ये कागदपत्रासाठींचे गुण जास्त आहेत. समितीच्या हाती अतिशय कमी गुण असणार आहेत. अतिशय पारदर्शक पद्धतीने निवड केली जाणार असून उमेदवारांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वसीमा शेख यांनी केले आहे.
बीड उपविभागातील पोलीस पाटील पदासाठी रिक्त असलेल्या एकूण ४३४ पदांसाठी दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षेसाठी एकूण १८५९ उमेदवारांची बैठक क्रमांकानुसार यादी दि.२६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून ती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. १० मार्च २०२६ या कालावधीत लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखती समाजकल्याण
कार्यालय, नगर रोड, बीड येथे आयोजित करण्यात आल्या असून मुलाखतीदरम्यान उमेदवारांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुलाखतीच्या पहिल्या दिवशी १०० तर दुसऱ्या दिवसापासून दररोज २०० परीक्षार्थीना बोलाविण्यात येणार आहे. मुलाखतीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया समितीमार्फत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून कोणत्याही अफवा अथवा गैरसमजांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis