मी आयुष्यात प्रामाणिकपणा कमावला आहे - केजरीवाल
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। दिल्लीत आम आदमी पार्टीला थेट पराभूत करता येत नसल्याचे भाजपला स्पष्ट दिसत होते. त्यामुळे आमची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले. “मी आयुष्यात प्रामाणिकपणा कमावला आहे. माझ्या इमानदारीवर आघात करण्याचा प
Arvind Kejriwal


नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। दिल्लीत आम आदमी पार्टीला थेट पराभूत करता येत नसल्याचे भाजपला स्पष्ट दिसत होते. त्यामुळे आमची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले. “मी आयुष्यात प्रामाणिकपणा कमावला आहे. माझ्या इमानदारीवर आघात करण्याचा प्रयत्न झाला. काही जण म्हणत होते की तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल गप्प झाले. पण मी देशासमोर निर्दोष ठरल्यानंतरच बोलेन, असे ठरवले होते,” असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

केजरीवाल यांनी दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. न्यायालयाच्या निर्णयाला ऐतिहासिक ठरवत त्यांनी हा संपूर्ण प्रकार राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आणि मोदी व शाह यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली.

ते पुढे म्हणाले की, माझ्या कुटुंबावर जेव्हा आरोप केले गेले तेव्हा मला वैयक्तिक वेदना झाल्या. मला कोणी बेईमान म्हणाल्यास फरक पडतो. मात्र मला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता आणि आहे. सत्याचा नेहमी विजय होतो, हे आम्ही आधीपासून सांगत आलो आहोत. न्यायालयाने दिलेला निकाल हा सत्याच्या विजयाचा पुरावा आहे. ज्या न्यायमूर्तींनी न्याय दिला त्यांचे मी आभार मानतो, असेही त्यांनी सांगितले.

केजरीवाल यांनी भाजपला थेट राजकीय आव्हान दिले. “जर हिंमत असेल तर दिल्लीत पुन्हा निवडणुका घ्या. भाजपने दहा पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन,” असे ते म्हणाले. दिल्लीतील सध्याची परिस्थितीही त्यांनी यावेळी मांडली. शहरातील रस्ते खराब झाले आहेत, सरकारी रुग्णालयांमध्ये औषधे मिळत नाहीत, मोहल्ला क्लिनिक बंद आहेत, शाळांची स्थिती खालावली आहे, प्रदूषण वाढले आहे आणि यमुना नदीची अवस्था दयनीय आहे, असा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणात आम आदमी पार्टीच्या मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकून पक्ष संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. “स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधी घडले नाही असे घडले. विद्यमान मुख्यमंत्र्याला घरातून ओढत नेऊन सहा महिने तुरुंगात ठेवले गेले. हा लोकशाहीवरील आघात होता,” असे ते म्हणाले.

आपल्याविरोधात सर्व प्रयत्न करूनही भाजपला यश आले नाही, असा दावा करत केजरीवाल म्हणाले की, आता त्यांच्याविरोधात लढण्याचा एकच मार्ग उरला आहे तो म्हणजे त्यांची हत्या; मात्र अशा धमक्यांना ते घाबरणार नाहीत. दिल्लीची जनता आमच्यावर विश्वास ठेवते आणि आमच्या प्रामाणिकतेची साक्ष देते, असे ते म्हणाले.

मद्य धोरण प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर केजरीवाल यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय आक्रमकपणा दाखवत भाजपला थेट आव्हान दिले आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे दिल्लीतील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande