
अहिल्यानगर, 27 फेब्रुवारी (हिं.स.) - आपला देश न्यायव्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणांच्या बळावर चालतो. विविध पक्ष, जाती, धर्म आणि समुदाय असलेल्या या मोठ्या देशात न्यायपालिकेमुळेच व्यवस्था सुरळीत चालते. अन्यथा अराजकता माजेल. आता न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, अरविंद केजरीवाल दोषी नाहीत, तर हा निर्णय स्वीकारला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. केजरीवालांनी समाज आणि देशाच्या भल्यासाठी जे काही करता येईल, ते करत राहावे. स्वतःचा किंवा पक्षाचा विचार करू नका, फक्त देश पुढे नेण्याचा विचार करावा, असा सल्लाही हजारेंनी दिला आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 23 जणांना आज न्यायालयाने मोठा दिलासा देत कथित मद्य घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता केली. या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.
अण्णा हजारे पुढे म्हणाले, केजरीवाल आणि सिसोदिया हे आमचेच कार्यकर्ते आहेत. मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात त्यांना अटक झाल्यावर त्यावेळी मी जे बोललो, त्यावेळी न्यायालयाचा निर्णय आला नव्हता. न्यायालयाचा निर्णय असता, तर मी असे बोललो नसतो. न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे. त्यांनी आपले देशहिताचे काम करत राहावं.
केजरीवाल यांनी भाजपवर आपल्या विरोधात कट रचून खोटे खटले दाखल केल्याचा आरोप केला होता. यावर हजारे म्हणाले, तो त्यांचा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांशी माझा काहीही संबंध नाही. मी कधीच सत्तापक्षाच्या जवळ गेलो नाही. त्यांना जे म्हणायचे आहे, ते ते म्हणू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी