
कोल्हापूर, 27 फेब्रुवारी (हिं.स.) : कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रवाशांच्या सुखसोयींमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने विमानतळ सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक न्यू पॅलेस, कोल्हापूर येथे पार पडली. समितीचे अध्यक्ष तथा खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले आणि सदस्य सचिव अनिल शिंदे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.बैठकीत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला तांत्रिक व प्रवासी सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यासोबतच कोल्हापूर विमानतळाची प्रतिमा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्याच्या दृष्टीने विविध निर्णय घेण्यात आले.
एअरबस सेवा व धावपट्टी विस्तारावर भर
कोल्हापूरच्या औद्योगिक व पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी एअरबस सेवा सुरू करण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यासाठी आवश्यक असलेली ट्रायल लँडिंग प्रक्रिया तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले. विमानतळ विस्तारासाठी आवश्यक भूसंपादन पूर्ण झाल्याने धावपट्टी वाढीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रवासी सुविधांमध्ये वाढ
प्रवाशांना परवडणारे तिकीट दर निश्चित करणे, दर्जेदार टॅक्सी सेवा उपलब्ध करणे, अल्पोपहार केंद्र उभारणे आणि पर्यटकांसाठी विशेष माहिती केंद्र सुरू करण्यावर एकमत झाले. विमानतळ सुरक्षा ऑडिटमधील त्रुटी दूर केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
विमानतळ परिसरातील रस्ते विस्तारीकरणास प्राधान्य देताना स्थानिक नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, 20 किलोमीटर परिसरातील उंच बांधकामांसाठी आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येणार असून, कचरा जाळण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.
कार्गो सेवांचा विस्तार
सध्या सुरू असलेल्या चांदी व औद्योगिक साहित्याच्या कार्गो सेवेचा विस्तार करून स्थानिक फुले, फळे आणि भाजीपाला वाहतुकीचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे स्थानिक शेतकरी व उद्योजकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
नवीन विमानमार्गांची मागणी
आगामी वर्षात दिल्लीसह शिर्डी, नागपूर, विशाखापट्टणम, चेन्नई आणि इंदूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी समितीने केली आहे. यामुळे कोल्हापूरची हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.
प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ
कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. 2018-19 मध्ये 17,843 असलेली प्रवासी संख्या 2023-24 मध्ये 1,57,320 वर पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारी 2026 अखेरपर्यंत 1,56,633 प्रवाशांनी 3,021 उड्डाणांद्वारे प्रवास केला असून, मार्चअखेर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरच्या विकासात विमानतळ हा महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.-------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar