
अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.) : श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय येथे शनिवारी (ता. २८ फेब्रुवारी) सकाळी १०.३० वाजता ‘साहित्याचे आयाम, पुनरावलोकनः नवे नवा दृष्टिकोन’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद महाविद्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडणार आहे.
मराठी, इंग्रजी, हिंदी व संगीत विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेचे अध्यक्षस्थान संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले भूषवणार आहेत. उद्घाटन संस्थेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष ऍड. गजाननराव पुंडकर यांच्या हस्ते होणार असून साहित्यश्री डॉ. बापूराव देसाई बीजभाषण करणार आहेत.
कार्यक्रमास संस्थेचे कार्यकारिणी सदस्य सुरेशदादा खोटरे तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
परिषदेत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले असून त्यात डॉ. विजया डबीर, डॉ. रमेश अंधारे, डॉ. मोना चिमोटे, डॉ. निलेश तारे, डॉ. अजय देशमुख आणि डॉ. पौर्णिमा दिवसे सहभागी होणार आहेत. निवडक संशोधक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचा समारोप होईल. या राष्ट्रीय परिषदेचा लाभ भाषाप्रेमी व अभ्यासकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीच्या सचिव डॉ. अर्चना बोबडे तसेच समन्वयक डॉ. सुवर्णा गाडगे, डॉ. अपर्णा सरोदे, डॉ. मनोज जोशी आणि डॉ. गजानन केतकर यांनी केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी