
लातूर, 27 फेब्रुवारी (हिं.स.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी महा विधी सेवा शिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता रुक्मिणी मंगल कार्यालय, लक्ष्मीप्रयाग बँक्वेट, पोदार इंटरनॅशनल स्कूलसमोर, औसा-बार्शी रिंग रोड, लातूर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लाभार्थी, शालेय विद्यार्थी, नागरिक तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे व्यंकटेश गिरवलकर यांनी केले आहे.
५० स्टॉल्सद्वारे योजनांची माहिती
शिबिरात विविध शासकीय विभागांचे सुमारे ५० स्टॉल्स उभारण्यात येणार असून, नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती व तात्काळ लाभ देण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
विविध घटकांसाठी मार्गदर्शन
या महाशिबिरात श्रमिक व मजूर, दिव्यांग व्यक्ती, बालकांशी संबंधित प्रकरणे, तृतीयपंथीय व्यक्ती, कारागृहातील कैदी, अनुसूचित जाती-जमाती, ज्येष्ठ नागरिक, भिकारी व बेघर व्यक्ती, रस्ता अपघातग्रस्त, नैसर्गिक आपत्तीग्रस्त तसेच मानवी तस्करीतील पीडित यांना कायदेशीर मदत व योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
न्यायमूर्तींची उपस्थिती
या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथील न्यायमूर्ती तथा लातूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर आणि न्यायमूर्ती वैशाली पाटील-जाधव उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात येणार आहेत.
या उपक्रमाद्वारे शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कांचा लाभ मिळवून देणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis