महा ई-सेवा व आधार केंद्र चालकांचा 9 मार्चपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्यातील महा ई-सेवा व आधार केंद्र चालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल स्तरीय महा ई-सेवा व आधार केंद्र संघटन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येत्या 9 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन क
महा ई-सेवा व आधार केंद्र चालकांचा 9 मार्चपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन


परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।

राज्यातील महा ई-सेवा व आधार केंद्र चालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल स्तरीय महा ई-सेवा व आधार केंद्र संघटन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येत्या 9 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असून, मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी कामबंद आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

एन. डी. धामणगावे, आदित्य बाकाळे, सचिन शेट्टी, अंगद सावंत, मोहम्मद इद्रीस, बालाप्रसाद डागा, बाबुराव मोरे आदींच्या शिष्टमंडळाने गुरुवारी याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनास सादर केले. त्याद्वारे, शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही तसेच न्यायालयीन याचिका दाखल करूनही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकार्यांनी स्पष्ट केले.

संघटनेने शासनासमोर 18 मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्रांची संख्या निश्चित करणे व अनावश्यक नवीन केंद्रांना परवानगी देणे थांबविणे, विविध योजनांचे थकीत कमिशन तात्काळ अदा करणे, दरमहा निश्चित मानधन व विमा संरक्षण लागू करणे, आधार प्रकल्पासाठी घेतलेली 50 हजार रुपयांची अनामत रक्कम परत करणे, तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र बंद किंवा ऑपरेटरला ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई थांबविणे, आदी मागण्यांचा समावेश आहे.

दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष डॉ. अमर पवार व राज्य सचिव विनोद तायडे यांनी सांगितले की, महा ई-सेवा व आधार केंद्रांमुळे शासनाच्या डिजिटल सेवा ग्रामीण व शहरी भागात प्रभावीपणे पोहोचत आहेत. मात्र केंद्र चालकांना आर्थिक अडचणी, थकीत देयके आणि प्रशासकीय त्रास सहन करावा लागत आहे. 9 मार्चपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर कामबंद आंदोलन करण्यात येईल. या कालावधीत जनसेवा विस्कळीत झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यातील सर्व महा ई-सेवा व आधार केंद्र चालकांनी मोठ्या संख्येने मुंबई येथे उपस्थित राहून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande