
पुणे, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन’च्या (महामेट्रो) प्रस्तावित खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेच्या ‘कारशेड’साठी लागणाऱ्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी थेट दिल्लीतील जलशक्ती मंत्रालयालाकडे मागणी करण्यात येणार आहे. खडकवासला येथील केंद्रीय जल आणि उर्जा संशोधन केंद्राने (सीडब्ल्यूपीआरएस) दोनदा पाठविलेल्या प्रस्तावाला नकार दिल्याने ‘महामेट्रो’कडून पुढचे पाऊल उचलण्यात आले आहे.शहराच्या पूर्व भागातून दक्षिण, उत्तर आणि मध्य पुण्यात सहज प्रवास करता यावा, वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळावा, याकरिता ‘महामेट्रो’कडून खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी हा प्रकल्प प्रस्तावित असून, केंद्राच्या अंतिम मान्यतेसाठी प्रलंबित आहे. तब्बल ३१.६४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पावर २८ स्थानके असून, राज्य सरकारकडून ९८९७ कोटींचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये या प्रस्तावित मार्गाला राज्याची मंजुरी मिळाली आहे. या मेट्रो प्रकल्पातील कारशेड हे खडकवासला येथे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी ‘महामेट्रो’ने खडकवासला येथील ‘सीडब्ल्यूपीआरएस’च्या आवारातील २० हेक्टर मोकळ्या जागेची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु