अलिबाग जिल्हा कारागृहात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
रायगड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव करणारा विशेष दिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषेचा समृद्ध इतिहास, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव करण्याबरोबरच आपल्या मायबोलीचा सन्
Marathi-Language-Pride-Day-cel


रायगड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव करणारा विशेष दिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषेचा समृद्ध इतिहास, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव करण्याबरोबरच आपल्या मायबोलीचा सन्मान व वारशाला उजाळा देण्याचा हा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग जिल्हा कारागृह येथे दाखल असलेल्या बंद्यांमध्ये मराठी भाषेविषयी आदर व अभिमान निर्माण व्हावा या उद्देशाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्या मार्फत प्राथमिक शिक्षक अजित हरवडे यांचे व्याख्यान आयोजित करून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

आपल्या मनोगतात अजित हरवडे यांनी 27 फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, असे सांगितले. मराठी भाषा संत, विचारवंत व साहित्यिकांनी समृद्ध केली असून ती आज जगभरात बोलली जाते, असेही त्यांनी नमूद केले. “मायबोली मराठी ही आपली ओळख, आपली शान आणि आपला अभिमान आहे. मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची ओळख आहे. त्यामुळे मातृभाषेचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.

हा उपक्रम मा. डॉ. सुहास वारके (भा.पो.से), अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या कार्यक्रमाला कारागृह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande