
कोल्हापूर, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। मराठी ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे, आपल्या इतिहासाचा अभिमान आहे आणि आपल्या भविष्यासाठीची प्रेरणाशक्ती आहे. मराठी भाषा जपा, वाढवा आणि अभिमानाने जगा, अशा प्रेरणादायी शब्दांत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थितांना मराठी संवर्धनाचा संदेश दिला. जिल्हा मराठी भाषा समिती, शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद कोल्हापूर व जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन २०२६’ व भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त तालुकास्तरीय स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचा हा भव्य कार्यक्रम शिवाजी पार्क येथील मुख्याध्यापक संघामध्ये उत्साहात पार पडला, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राजाराम महाविद्यालयाचे मराठी व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे सौंदर्य आणि सामर्थ्य अत्यंत प्रभावी शब्दांत उलगडले. ते म्हणाले, मराठी भाषा अतिशय गोड, मदनमोहक, सुंदर आणि समृद्ध आहे. ही भाषा सौंदर्यांनी नटलेली आहे, भावनांनी भरलेली आहे, पराक्रमाने गाजलेली आहे. नवरसांनी चिंब भिजलेली अशी ही भाषा आपल्या जीवनाला अर्थ देते, विचारांना दिशा देते आणि मनाला संस्कार देते. म्हणूनच मराठी भाषा ही जपलीच पाहिजे.
त्यांच्या या विचारांनी विद्यार्थ्यांच्या मनात मराठीबद्दलचा अभिमान अधिक दृढ झाला. भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
निबंध,वक्तृत्व,अभिवाचन,कथालेखन, कथाकथन स्पर्धा
या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या विचारांची, कल्पनाशक्तीची आणि भाषिक कौशल्यांची झलक सादर केली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, पुस्तके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध विभागातून आलेले विद्यार्थी, पालक व मराठी विषयाचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. संयोजन अपर्णा वाईकर व सचिन यादव यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले. आभार प्रदर्शन विजय सरगर यांनी तर सूत्रसंचालन निशा साळुंखे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण कुंभार, सदाशिव हाटवळ, सचिन हावळ, नेताजी डोंगळे, एम. एस. पाटील, युवराज कोथळे, रामकृष्ण गव्हाणकर, अन्वर पटेल, काका पाटील, जयश्री पिंगळे, विजया दिंडे, सविता खाबडे आदींसह जिल्हा मराठी अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी कार्यरत होते.
मराठी भाषा गौरव दिन २०२६ निमित्त पार पडलेला हा सोहळा केवळ पारितोषिक वितरण कार्यक्रम नव्हता, तर मराठी भाषेच्या वैभवाचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा उत्सव ठरला. मराठी ही संतांच्या अभंगांची, शाहिरांच्या पोवाड्यांची, कवींच्या ओव्या-भावगीतांची आणि स्वातंत्र्यवीरांच्या पराक्रमाची भाषा आहे. ती जपणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा वारसा जपणे होय. भाषा जपली तर संस्कृती जपली जाईल; संस्कृती जपली तर राष्ट्र अधिक सक्षम आणि समर्थ बनेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar