
रायगड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। कर्जत-कल्याण परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून प्रवासी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. इंडियन रेल्वे यूजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी (IRUCC) सदस्य नितीन परमार आणि कर्जत प्रवासी संघटनेचे सचिव प्रभाकर गांगवणे यांनी मध्य रेल्वे मुख्यालय व रेल्वे मंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. एक महिन्यात ठोस निर्णय न झाल्यास कर्जत स्थानकावर आंदोलन व स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
परीक्षांच्या काळात लोकल गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. एस्केलेटर व लिफ्टसारख्या सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी गर्दीच्या वेळी अनेक एस्केलेटर बंद असतात. डोंबिवली (पूर्व) येथील एस्केलेटर सकाळच्या गर्दीत बंद असल्याची तक्रार करण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणा असूनही गैरप्रकारांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
दिवा–वसई मार्ग सुरू होऊनही पूर्ण उपनगरी सेवा सुरू झालेली नाही. कलवा–ऐरोली प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडलेला आहे. कल्याण–पनवेल दरम्यान थेट लोकल सेवा नसल्याने प्रवाशांना अतिरिक्त प्रवास करावा लागतो. नेरळ येथे सुविधा तयार असूनही थेट सेवा सुरू करण्यात आलेली नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे.
अलीकडे १५ डब्यांच्या रेक पश्चिम रेल्वेला देण्यात आल्याने मध्य रेल्वेला समान प्राधान्य का दिले जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्रातील मार्गांकडे तुलनेने दुर्लक्ष होत असल्याची भावना प्रवाशांत आहे.
रेल्वे वेळापत्रकात सुधारणा, पूर्वीचे थांबे पुन्हा सुरू करणे, देखभाल व्यवस्थेत बदल आणि महाराष्ट्रातील रेल्वे संपर्काला समान प्राधान्य देणे या मागण्यांवर त्वरित निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रवासी संघटनांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके