मुंबई-अमरावती विमानसेवा २९ मार्चपासून आठवड्यातून पाच दिवस
अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। अमरावती-मुंबई या विमानसेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता अलायन्स एअरने आता विमानसेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आठवड्यातून पाच दिवस ही विमानसेवा सुरू होणार आहे. अलायन्स एअरच्या संकेतस्थळावर
मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा २९ मार्चपासून आठवड्यातून पाच दिवस


अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।

अमरावती-मुंबई या विमानसेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता अलायन्स एअरने आता विमानसेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आठवड्यातून पाच दिवस ही विमानसेवा सुरू होणार आहे. अलायन्स एअरच्या संकेतस्थळावर बुकिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या २९ मार्चपासून आठवड्यातून पाच दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे. सध्या आठवड्यातून चार दिवस विमान मुंबईच्या दिशेने झेपावते.

अलायन्स एअरने गेल्या वर्षी २६ ऑक्टोबरपासून हिवाळी वेळापत्रकानुसार महत्वपूर्ण बदल केले. दुपारच्या ऐवजी मुंबई-अमरावती ही विमानसेवा सकाळी ७.०५ ते ८.५० आणि अमरावती-मुंबई ही विमानसेवा सकाळी ९.१५ ते १०.३० या वेळेत सुरू करण्यात आली. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे चार दिवस ही सेवा उपलब्ध होती. पुर्वीच्या वेळापत्रकानुसार मुंबईहून दुपारी ३.२५ वाजता उडणारे विमान हे सायंकाळी अमरावती विमानतळावर पोहचत होते आणि सायंकाळी ५.३५ वाजता मुंबईसाठी उड्डाण घेत होते. मुंबईला विमान पोहचण्याची वेळ ही सायंकाळी ७.२० वाजताची होती. या वेळांमुळे प्रवाशांना दिवसभराची कामे करण्यासाठी वेळ मिळत नव्हता.

ही विमानसेवा सोयीची नसल्याची तक्रार होती. त्यामुळे विमानसेवा सकाळच्या सत्रात सुरू करण्यात आली. पण, डिसेंबरमध्ये हवामानात सातत्याने होणारे बदल आणि दाट धुक्यामुळे दृश्यमानतेच्या समस्येने विमानसेवेला फटका बसला. १ ते १५ डिसेंबरदरम्यान विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर ती पूर्ववत सुरू करण्यात आली, तरी ती आठवड्यातून दोनच दिवस ठेवण्यात आली आणि वेळेतही बदल करण्यात आला होता. पण गेल्या २ जानेवारीपासून आठवड्यातून चार दिवस विमानोड्डाण सुरू झाले. आता येत्या २९ मार्चपासून आठवड्यातून पाच दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे.

सध्या अलायन्स एअरची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार रोजी उपलब्ध आहे. २९ मार्चपासून रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार असे पाच दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे. हे विमान मुंबईहून सकाळी ७.०५ वाजता अमरावतीकडे झेपावते. १ तास ४५ मिनिटांनी सकाळी ८.५० वाजता अमरावती विमानतळावर पोहचते. त्यानंतर हेच विमान परतीच्या प्रवासात सकाळी ९.१५ वाजता मुंबईसाठी उड्डाण घेते आणि सकाळी ११ वाजता मुंबईत पोहचते. अलायन्स एअरने विमानसेवा पाच दिवस विस्तारीत केली असताना वेळेत मात्र कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. प्रवाशांसाठी ही चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande