
नांदेड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। नांदेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी शंभर दिवसांत विविध महत्त्वाकांक्षी कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महापौर कविता मुळे आणि आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली. महापौर कविता मुळे यांनी सांगितले की, शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात येत आहेत. सर्व कामांसाठी वेळबद्ध नियोजन करण्यात आले असून प्रशासन यासाठी युद्धपातळीवर काम करणार आहे.
नागरिकांना दर दोन दिवसाआड शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येणार असून पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे. गोवर्धन घाट व सिडको परिसरात पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनीचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे शहरात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळाही उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
महिलांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ शौचालय उभारण्यात येणार असून यासाठी आवश्यक निधी आणि जागा निश्चित करण्यात आली आहे. शहरातील राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांजवळ तसेच विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, प्रायो प्रायोगिक तत्वावर शहरातील विविध चौकात अद्ययावत सिग्नल बसविणे, चार्जिंग स्टेशन सुरू करणे, लोकसेवा हक्क अंतर्गत ७४ सेवा नागरिकांसाठी ऑनलाईन सुरू करणे, आरोग्यसेवा बळकट करणे, अनाधिकृत होर्डिंग्जमुक्त शहर करणे, प्रमुख चौक अतिक्रमणमुक्त करणे, शहरातील मोक्याच्या जागा अतिक्रमणमुक्त करणार आदी कामेही या काळात करणार असल्याचे मुळे यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस खा. अशोकराव चव्हाण, माजी आ. अमरनाथ राजूरकर, उपमहापौर दिपकसिंह रावत, सभागृह नेते अॅड. महेश कनकदंडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपयुक्त स. अजितपालसिंघ संधू, निलेश सुकेवार, वायकोस, महापौर प्रतिनिधी संतोष मुळे आदींची उपस्थिती होती.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis