मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज - डॉ. शेषराव मोहिते
लातूर, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। ज्यांच्यावर आपल्या मातृभाषेचा खोल प्रभाव आहे, असे लोक यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आपली मुले व नातवंडे यांना मातृभाषेतील शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार डॉ. शेषर
जिल्हाधिकारी कार्यालय


लातूर, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। ज्यांच्यावर आपल्या मातृभाषेचा खोल प्रभाव आहे, असे लोक यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आपली मुले व नातवंडे यांना मातृभाषेतील शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते यांनी केले. तसेच दैनंदिन जीवनात मराठीचा वापर करून आपल्या मातृभाषेच्या सन्मानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ ग्रामीण कथाकार प्रा. सुरेंद्र पाटील, ज्येष्ठ साहित्यिक तथा ग्रामीण कृषी शब्दांचे अभ्यासक प्रा. द. मा. माने, ज्येष्ठ साहित्यिक-कवयित्री तथा बालकथाकार वृषाली पाटील, ज्येष्ठ कथाकार जी. जी. कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपजिल्हाधिकारी गणेश पवार, उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मराठी भाषेत अद्वितीय साहित्यनिर्मिती झाली आहे. साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे आणि वैश्विक पातळीवरही तिचा गौरव वाढवला आहे. मात्र सद्य:स्थितीत साहित्यनिर्मिती विखुरलेल्या स्वरूपात होत असल्याचे डॉ. शेषराव मोहिते यांनी नमूद केले. तसेच ग्रामीण साहित्याची समृद्ध परंपरा यावेळी त्यांनी सांगितली.

प्रत्येक जिल्ह्याची ओळख त्याच्या सांस्कृतिक वैभवावर आणि साहित्य संपदेवरून होते. आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत मराठी भाषेचा खूप मोठा वाटा आहे. मराठी भाषेची अस्मिता, आपली मायबोली प्रत्येकापर्यंत पोहोचवून आपण तिचा सन्मान करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले.

ज्येष्ठ ग्रामीण कथाकार प्रा. सुरेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मराठी भाषेचा लौकिक साहित्यिकांनी वाढविला आहे. आपण सर्वजण मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो, परंतु मराठी भाषेला समृद्ध करायचे असेल, तर लग्नसमारंभ, सोहळे व इतर कार्यक्रमांत मराठी पुस्तके नातेवाईक, मित्रांना भेट देण्याचा संकल्प करावा. मराठी साहित्याचे गंभीरतेने वाचन करूया, मराठीत बोलूया, मराठी भाषेचे संवर्धन करूया आणि लातूरची मराठी भाषा व संस्कृती जपूया, असे त्यांनी आवाहन केले.

ज्येष्ठ साहित्यिक तथा ग्रामीण कृषी शब्दांचे अभ्यासक प्रा. द. मा. माने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आज कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. मराठी भाषा टिकली पाहिजे, तिचे संवर्धन झाले पाहिजे आणि मराठी शाळा वाढल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. कृषी विषयातील अनेक मराठी शब्द हरवले आहेत; त्यांना पुन्हा जवळ करावे. मराठीतच संवाद साधावा आणि मराठी भाषेचे संवर्धन करावे, असे त्यांनी सांगितले.

वृषाली पाटील यांनी फुंकर ही मराठी कविता सादर केली. ज्येष्ठ कथाकार जी. जी. कांबळे यांनी घर असावे घरासारखे, नकोत भिती असे सांगून मुलांमध्ये लहानपणापासूनच लेखनाची आवड निर्माण करावी, असे सांगितले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रभाकर कापसे यांचा पुस्तक भेट देऊन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांसाठी ग्रंथदालन

जिल्हाधिकारी कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील अभ्यागत कक्षात मराठी ग्रंथालय दालन तयार करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, गणेश पवार, सायली ठाकूर, तहसीलदार संदीप कुलकर्णी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमातून मराठी भाषेचे संवर्धन, वाचन संस्कृती रुजवणे आणि मायबोलीचा गौरव करण्याचा संदेश देण्यात आला. जिल्हा ग्रंथालय संघ लातूर व जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील मराठी ग्रंथालय दालनासाठी ५०० ग्रंथ भेट देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande