माय मराठीचा मान; मनसेची अनोखी गांधीगिरी
मुंबई, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्यभरात आज मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी कायम आग्रही असलेल्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनानेही विविध उपक्रम राबवत हा दिवस वेगळ्या पद
My Marathi pride MNS unique Gandhism


मुंबई, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। राज्यभरात आज मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी कायम आग्रही असलेल्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनानेही विविध उपक्रम राबवत हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. मुंबईत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रमुख संपादकांना निमंत्रित करून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. यावेळी बोलताना मातृभाषा अवगत असलेला माणूस कधीच मागे राहत नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपली ओळख आणि संस्कृतीचा पाया आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मुंबईसोबतच ठाण्यातही मनसेकडून हटके उपक्रम राबवण्यात आला. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात मनसेच्या वतीने उत्तर भारतीय नागरिकांसाठी रस्त्यावरच मराठी शिकवणी भरवण्यात आली. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने उत्तर भारतीयांना मराठी आणि बाराखडीचे धडे देण्यात आले. मराठी बाराखडीची पुस्तकेही त्यांना वाटण्यात आली. नेहमी मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेने यावेळी गांधीगिरीचा मार्ग अवलंबत प्रेमाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

या उपक्रमात मनसे शहराध्यक्ष रविंद्र मोरे आणि प्रभाग अध्यक्ष उमेश यादव यांनी स्वतः उपस्थित राहून उत्तर भारतीयांना मराठी शिकवली. रस्त्यावरच भरवलेल्या या शिकवणीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मराठी शिकताना परप्रांतीय नागरिकही आनंदी दिसून आले. संवादातून आणि आपुलकीतून भाषा शिकवण्याचा हा प्रयत्न असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी परिधान केलेल्या टी-शर्टचीही चर्चा रंगली. त्यांच्या टी-शर्टवर ‘गर्वच नाही मला माज आहे मराठीचा’ असा संदेश झळकत होता. या संदेशातून मराठीबद्दलचा अभिमान आणि आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना मनसेच्या या उपक्रमाची विशेष चर्चा होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande