
अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।होळी हा आनंदाचा आणि रंगांचा सण. फाल्गुन महिन्यात होळी दहन केलं जातं. परंतु, अमरावती शहराची ग्रामदैवत असणाऱ्या श्री अंबादेवी मंदिरासमोर महिनाभर आधीच माघ पौर्णिमेला होळी उभारली जाते. या होळीत महिनाभर नवसाचे नारळ रचले जातात आणि ओटी भरली जाते. 'नवसाची होळी' अशी ओळख असणाऱ्या या होळीची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.
दर वर्षी माघ पौर्णिमेला अंबादेवी मंदिरासमोर होळी उभारली जाते. जळताना वातावरण प्रसन्न करणारं आणि औषधी गुण असणारा धूर वातावरणात पसरविणाऱ्या हेटीच्या झाडाचं खोड मध्यभागी उभारलं जातं. यानंतर या होळीत शास्त्रोक्त विधीद्वारे नारळ, शेणाचा गोवऱ्या रचल्या जातात. गाठी देखील वाहिली जाते. काही लाकडं या होळीत उभारली जातात. यावर्षी 12 फेब्रुवारीला ही होळी संपूर्ण धार्मिक विधीसह उभारण्यात आली आहे,
माघ पौर्णिमेपासून अंबादेवी मंदिरासमोर होळी रचण्यात आली आहे. या होळीला महिला ओटी आणि नारळ वाहण्यासाठी रोज येत आहेत. महिला आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी होळीला ओटी भरून नवस करतात. यासह ज्यांच्या इच्छा पूर्ण होतात त्या महिला देखील होळीची ओटी भरतात आणि नारळ अर्पण करतात. होळीच्या दिवशी घरात अनेक कामं आल्यानं महिलांना होळीच्या दिवशी येणं शक्य होत नाही. त्यामुळं महिला आधीच आपल्या नवसाची ओटी आणि नारळ वाहतात. सव्वाशे वर्षांपासून ही प्रथा सुरू असल्याची नोंद श्री अंबादेवी मंदिर संस्थेत आहे.
होळी पौर्णिमेला सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी विधीद्वारे होळी पेटवली जाते. होळीला देवी मानलं जातं. मंदिर संस्थांच्यावतीनं खणा नारळाची ओटी भरली जाते. यावेळी शेकडो भाविक होळीमध्ये नारळ अर्पण करतात. सायंकाळी संपूर्ण विधीसह होळी पेटवली जाते,
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी