
छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी (हिं.स.) डॉ.नागेश अंकुश यांनी “निर्दोष मराठी लेखन” कार्यशाळेत भाषेच्या शुद्धतेपेक्षा वाचन, आकलन, उपयोजन, मूल्यांकन आणि सर्जनशीलतेवर भर देणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मायमराठी गौरव महोत्सवात मराठी विभागाच्या सभागृहात हे सत्र घेतले गेले.
डॉ. अंकुश म्हणाले की, फक्त भाषेचा वापर करून भाषाप्रभू होणे शक्य नाही. भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते; ती प्रमाण व बोलीवर आधारित असते. भाषा नीटनेटकी लिहिणे म्हणजे शुद्धलेखन करणे आणि संस्कृती जपणे. त्यांनी लेखन नियम, अनुस्वार, विसर्गयुक्त शब्द, विरामचिन्हे आणि लेखनाच्या बदलत्या इतिहासावर सविस्तर प्रकाश टाकला. पीपीटीच्या माध्यमातून हे सर्व उदाहरणांसह समजावून सांगितले गेले.
कार्यशाळेत विनोद जैतमहाल यांनी सांगितले की, लिहिण्यामुळे माणसाचा विचार नेटका आणि काटेकोर होतो. भाषेचे अचूक ज्ञान असणे आवश्यक आहे. मराठीत एकूण २२ उपसर्ग असून त्यानुसार धातू, स्वर, व्यंजन, मृदू-कठोर व्यंजन, ऱ्हस्व-दीर्घ यावरही सविस्तर माहिती देण्यात आली.
डॉ.दासू वैद्य यांनी प्रास्ताविकात सांगितले की, भाषेबद्दल वेड लागले पाहिजे. आपले लेखन शुद्ध व निर्दोष असावे; भाषेची व्यवस्था तशीच पक्की असावी जशी समाजात आहे. त्यांनी इंग्रजी भाषेच्या वाढीचे कारणही सांगितले व मराठी मासिके व पुस्तके टिकाव धरावी यावर भर दिला.
कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. रामेश्वार वाकणकर, तर दुसऱ्या सत्राचे सानिया बेग यांनी केले, तर आभार मीरा थोरात यांनी मानले.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis