
लातूर, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। उदगीर शहरात मागील चार वर्षांपासून श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात व भव्य स्वरूपात साजरा केला जात आहे. रामनवमीच्या निमित्ताने दरवर्षी शहरातून भक्तिमय व आकर्षक शोभायात्रा काढली जाते. ढोल-ताशांचा गजर, डीजेचा निनाद आणि देशभरातून बोलावण्यात येणारे विविध देखावे यामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात रंगून जाते.
या उत्सवाची तयारी रामनवमीच्या साधारण दोन महिने आधीपासूनच सुरू होते. विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. आतापर्यंत अनेक नामांकित वक्त्यांचे कार्यक्रम येथे पार पडले असून यावर्षीही विविध कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आली आहे.
श्रीराम प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तथा यावर्षीचे अध्यक्ष सतीश राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न केला जातो. यासाठी स्वतंत्र नियोजन समिती स्थापन करून प्रत्येक सदस्याला आपापली जबाबदारी देण्यात येते. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी नियमित बैठका घेऊन तयारीला वेग दिला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्सवाच्या कार्यक्रमांची सुरुवात भाजपाचे शहराध्यक्ष अमोल अनकल्ले यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजन व कार्यक्रमांच्या बॅनर विमोचनाने करण्यात आली. या वेळी उदगीर शहरातील नवनिर्वाचित नगरसेवक, श्रीराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आनंद घेत प्रभू श्रीराम यांच्या जयघोषात यावर्षीचा रामनवमी उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
आता अवघ्या काही दिवसांवर रामनवमी येऊन ठेपली असून विविध कार्यक्रमांच्या तारखा जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचार-प्रसाराची यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली असून लवकरच नियोजित सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis