परभणी : रुग्णांना वेळेवर तत्परतेने आरोग्य सुविधा द्या – महापौर
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांवर कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. रुग्णांना वेळेवर आणि तत्परतेने आरोग्य सुविधा द्याव्यात, तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे काम करावे
रुग्णांना वेळेवर तत्परतेने आरोग्य सुविधा द्या – सय्यद इकबाल यांचे निर्देश महापौरांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा


परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांवर कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. रुग्णांना वेळेवर आणि तत्परतेने आरोग्य सुविधा द्याव्यात, तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे काम करावे, अशा स्पष्ट सूचना महापौर सय्यद इकबाल यांनी दिल्या.

परभणी महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांची पाहणी करून त्यानंतर बी. रघुनाथ सभागृहात शुक्रवारी (दि. 27) आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमहापौर गणेश देशमुख, माजी उपमहापौर सय्यद समी उर्फ माजुलाला, नगरसेवक श्याम खोबे, नगरसेवक राजेश रणखांबे, शेख रईस शेख हबीब, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, समन्वय व्यवस्थापक गजानन जाधव, लेखा अधिकारी अमोल काटोके यांची उपस्थिती होती. बैठकीत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेविका व आशा वर्कर्स यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. शहरातील सर्व आरोग्य केंद्रे पूर्णवेळ सुरू ठेवावीत, नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, तसेच महिलांशी व नागरिकांशी सन्मानपूर्वक वागावे, अशा सूचना देण्यात आल्या. प्रत्येक आरोग्य केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची योग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. “परभणी शहर माझं घर आहे; सर्वांना सोबत घेऊन काम करणार,” असेही त्यांनी यावेळी सांगितले. आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका व आशा वर्कर्स यांच्या अडीअडचणी लेखी स्वरूपात घेण्यात आल्या. सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले. मराठी दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देत बैठकीचा समारोप झाला. आभार प्रदर्शन आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande