
मुंबई, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूत फिरत आहेत. अपघात हा धुक्याने झाला की धोक्याने हे सुरू आहे. असे मनसेप्रमुख राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. दरम्यान रोहित पवार यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेत अजितदादांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी व्यापक पाठिंबा मिळावा अशी मागणी केली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका करत हा विषय राजकारणाच्या पलीकडचा असून महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले.
रोहित पवारांनी हा प्रश्न सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात मांडावा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी तो लोकसभेत उपस्थित करावा, असा सल्ला आपण दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी सांगितले की, रोहित पवार यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिन्ही ठिकाणी तो नोंदवून घेण्यात आला नाही. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अधिकारी एफआयआर टाईप करत असताना संबंधित डीसीपींनी येऊन तो नोंदवू नये, अशा सूचना दिल्याचा आरोप त्यांनी केला. अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूबाबत एफआयआर घेतला जात नसेल, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे काय होणार, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
जर हा केवळ अपघात असेल आणि त्यात कोणताही घातपात नसेल, तर तक्रार नोंदवण्यास सरकारकडून अडथळे का आणले जात आहेत, असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. यामुळे संपूर्ण प्रकरणाभोवती संशयाचे सावट निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. एफआयआर नोंदवून त्यानुसार चौकशी करणे ही अत्यंत साधी प्रक्रिया असताना सरकार पोलीस यंत्रणेवर दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी सुनेत्रा वहिनींनी या प्रकरणावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या सध्या उपमुख्यमंत्री पदावर आहेत आणि अजित पवार त्यांचे पती होते, त्यामुळे या अपघाताबाबत त्यांनी गांभीर्याने विचार करून भूमिका मांडली पाहिजे, असे ते म्हणाले.
विमान अपघाताच्या संदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी ‘ब्लॅक बॉक्स’ कधीच नष्ट होत नाही, असे सांगत त्याबाबत अद्याप स्पष्ट माहिती का दिली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. सीआयडी आणि सीबीआय चौकशी नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे, तसेच डीजीसीएचा प्राथमिक अहवाल अद्याप का सादर झाला नाही, याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. एका महिन्यात प्राथमिक अहवाल देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र तो अद्याप जाहीर झालेला नसल्याने लोकांच्या मनात शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule