
कोल्हापूर, 27 फेब्रुवारी (हिं.स.) : राजर्षी शाहू महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात कोल्हापुरात उभारलेली शाहू मिल २००३ साली बंद पडली. त्यानंतर या मोक्याच्या जागेच्या खासगीकरणाचे प्रयत्न झाले; मात्र कोल्हापूरच्या जागरूक नागरिकांनी त्याला विरोध केला. पुढे या जागेवर शाहू महाराजांचे जिवंत स्मारक उभारावे, अशी मागणी जोर धरू लागली.
कोल्हापुरातील छत्रपती शाहू मिल येथील सुमारे २७ एकर जागेत राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी डिसेंबर २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. विधीमंडळात राजदंड उचलून या प्रश्नाचे गांभीर्य राज्य सरकारच्या निदर्शनास आणण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन मंत्री व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यास तत्वत: मंजुरी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
मात्र, हे स्मारक आजतागायत कागदोपत्रीच राहिल्याने शाहू प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री यांना लेखी पत्र देऊन, शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मारकाच्या कामाला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
वस्त्रोद्योग मंत्र्यांनी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सचिव, वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांना “कॅबिनेटसाठी प्रस्ताव मागवावा” असे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२६ मध्ये या स्मारकासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
पत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, वस्त्रोद्योग विभागाने स्मारकाबाबत सर्वसमावेशक आराखडा तयार केला असून तो लवकरच कोल्हापुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर सादर केला जाणार आहे. यासंदर्भातील बैठक लवकरच बोलावण्यात येणार असून त्यानंतर हा प्रस्ताव शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर केला जाईल.
राजर्षी शाहू मिल परिसरात आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल पडल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar