
छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक प्रवर्गाच्या ७३ जागांसाठी राज्य शासनाच्या नवीन नियमावली, कार्यपध्दतीप्रमाणे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यापुर्वी अर्ज केलेल्यांना नव्याने ’एआरसी’ भरावा लागणार असून नवीन उमेदवारांना देखील अर्ज दाखल करता येईल, अशी माहिती कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी दिली.
महराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठातील अध्यापकांच्या निवड प्रक्रिया राबविण्यात बाबत राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने कार्यपध्दती संदर्भात शासन आदेश जारी करण्यात आला. या नूसार ’एआरसी’ (Academic & Research Credentials) भरण्यासंदर्भात निश्चिती करण्यात आली. ६०ः२०ः२० या प्रमाणे अकॅडमिक रेकॉर्ड, अध्यापन कौशल्ये व मुलाखत असे प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. शिक्षक प्रवर्गातील ७३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य परिसर तसेच धाराशिव उपपरिसरातील जागांचा समावेश आहे. यामध्ये मानव्यविद्या, वाणिज्यशास्त्र, आंतरविद्याशाखा व विज्ञान तंत्रज्ञान या चारही विद्याशाखेतील जागांचा समावेश आहे. यामध्ये प्राध्यापक प्रवर्गातील आठ तर सहयोगी प्राध्यापक पदाच्या १२ जागांचा समावेश आहे. तर सहाय्यक प्राध्यापकांच्या ५३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. १८ मार्च पर्यंत आस्थापना विभागात दोन प्रतीत हार्ड कॉपी दाखल करता येणार आहे. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपुर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
यापुर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये अर्ज दाखल केलेल्यांना नव्याने ’एटीआर’ भरावा लागणार होते . त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
तर या सर्व पदांसाठी नवीन उमेदवारांना देखील अर्ज दाखल करता येईल, अशी माहिती कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी दिली. जाहिरातीतील एकूण पदे, आरक्षण, शुल्क व अन्य माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
चारही विद्याशाखांच्या अधिष्ठाताची पदे १ जानेवारी २०२४ पासून रिक्त आहेत. सध्या या पदांवर प्रभारी नेमणूका करण्यात आलेल्या आहे. या जाहिरातील चारही विद्याशाखांच्या अधिष्ठातांचीही पदे तसेच ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक पद भरण्यात येणार आहे. यापूर्वी आवेदन दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही तर नव्याने अर्ज दाखल करण्यासाठीही वरील प्रमाणेचे तारीख निश्चित करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis