
रायगड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। खोपोली शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या आणि बदलती नागरी गरज लक्षात घेता शहराचे टाऊन प्लॅनिंग पुन्हा नव्याने करण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
शहरातील रस्त्यांची वाढती वाहतूक कोंडी, अपुरी पार्किंग व्यवस्था, अनियोजित बांधकामे, नाले व पावसाळी पाण्याचा निचरा, तसेच सार्वजनिक सुविधांची कमतरता या पार्श्वभूमीवर सध्याचे विकास आराखडे अपुरे ठरत असल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले. खोपोली हे औद्योगिक व निवासी दृष्टीने महत्त्वाचे शहर असून भविष्यातील वाढ लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकासाची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यामध्ये रस्ते रुंदीकरण, नवीन अंतर्गत मार्गांची निर्मिती, सांडपाणी व पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणा, हरित क्षेत्रांचे जतन, तसेच व्यापारी व निवासी क्षेत्रांचे शास्त्रोक्त पुनर्विनियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगरविकास विभागाने याबाबत विशेष समिती नेमून सविस्तर सर्वेक्षण करावे व अद्ययावत विकास आराखडा (DP Plan) तयार करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
खोपोलीकरांच्या भविष्यासाठी सुयोग्य, शाश्वत व नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके