वाल्मीक कराडचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
बीड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। मस्साजोग(ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. यापूर्वी विविध न्यायालयांनी वाल्मीक कराडचा जामीन तसेच दोषमुक्
वाल्मिक कराड


बीड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।

मस्साजोग(ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. यापूर्वी विविध न्यायालयांनी वाल्मीक कराडचा जामीन तसेच दोषमुक्तीसाठीचे अर्ज फेटाळले होते.

सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर २०२४ ला टाकळी फाट्याजवळून (ता. केज) अपहरण करून त्यांची निघृण हत्या करण्यात आली होती. हत्या, अवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागणी, याच कंपनीच्या मस्साजोग प्रकल्पावरील भांडण व तेथील सुरक्षा रक्षकाला जातीवाचक शिवीगाळ या तिन्ही प्रकरणांचा एकत्रित तपास विशेष पथकाने केला. यात वाल्मीक कराड, विष्णू चाटे,

सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांच्यावर कट करून खून, खंडणी, जातीवाचक शिवीगाळ केल्याचे आरोप निश्चित करण्यात आले. यातील कृष्णा आंधळे अद्याप फरारी आहे. या प्रकरणाची सुनावणी येथील विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांच्या न्यायालयात सुरू आहे.

या प्रकरणात वाल्मीक कराड याचे नाव आल्यानंतर पुन्हा त्याच्यावर आवादा कंपनीला खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद झाला. त्यानंतर तो डिसेंबर २०२४ मध्ये पुण्यात पोलिसांना शरण आला. त्यानंतर त्याला अटक झाली. सुरवातीला काही दिवस पोलिस कोठडी व नंतर तो न्यायालयीन कोठडीत आहे.

वाल्मीक कराडने यापूर्वी स्थानिक न्यायालयात जामीन, दोषमुक्तीसाठी केलेले अर्ज फेटाळल्यानंतर त्याने

उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन, दोषमुक्तीसाठीचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश यांनी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. मात्र, 'ट्रायल' पुढे जात नसेल तर वाल्मीकला पुन्हा जामिनासाठी अर्ज करता येणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande