
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रभावी साहित्यिक आणि दूरदृष्टीचे विचारवंत होते. त्यांच्या लेखनातून व कृतीतून राष्ट्रभक्तीची जाज्वल्य प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन सहपर्यवेक्षक सुनील रामपुरकर यांनी केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 59 व्या पुण्यतिथीनिमित्त नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूलमध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सेमी इंग्रजी विभागाचे पर्यवेक्षक सूर्यकांत पाटील, सहपर्यवेक्षक नंदकुमार साळवे, विद्यार्थी संसद सल्लागार श्रीपाद कुलकर्णी, शिवप्रसाद कोरे, अभिजित कुलकर्णी, सागर सूडके आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते सहपर्यवेक्षक रामपुरकर यांनी सावरकरांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. आपल्या भाषणात त्यांनी सावरकरांना प्रखर राष्ट्रभक्त, थोर क्रांतिकारक, समाजसुधारक व हिंदुत्ववादी विचारवंत म्हणून गौरविले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सहन केलेल्या हालअपेष्टा व बलिदानाचा उल्लेख करताना अंदमानातील सेल्युलर कारागृहातील कठोर शिक्षेचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना राष्ट्रनिष्ठा, धैर्य आणि कर्तव्यपरायणतेचा संदेश दिला. सावरकरांचा ‘राष्ट्रप्रथम’ हा विचार आजच्या तरुणाईसाठी दीपस्तंभ आहे. सामाजिक समता, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन आणि संघटित समाजरचनेचा संदेश देणारे सावरकर हे केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर प्रभावी साहित्यिक आणि दूरदृष्टीचे विचारवंत होते. त्यांच्या लेखनातून व कृतीतून राष्ट्रभक्तीची जाज्वल्य प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीपाद कुलकर्णी यांनी केले. आभार कोरे यांनी मानले. उपस्थितांचे आभार मानत त्यांनी सावरकरांच्या विचारांचे आचरण जीवनात करण्याचे आवाहन केले. देशभक्तीची जाज्वल्य भावना जागृत करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यावेळी मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis