
अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.) : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अचलपूर येथील नगर परिषद हद्दीत गांधी पूल परिसरात सुरू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या प्रथम मजल्याच्या बांधकामात गंभीर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. सुमारे ₹७८,१८,३०४/- खर्चाच्या या कामात बांधकाम पूर्ण न होताच संबंधित कंत्राटदारास सलग १ ते ४ असे RA बिले अदा करण्यात आल्याने लाखोंचा घोटाळा झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
माहितीनुसार, कंत्राटदाराने हे काम अंदाजपत्रकापेक्षा २९.७८७ टक्के कमी दराने स्वीकारले होते. मात्र प्रत्यक्ष पाहणीत अनेक महत्त्वाचे आयटम अपूर्ण असल्याचे दिसून येत असून, तरीही मोजमाप पुस्तिकेत चुकीच्या नोंदी करून बिले काढल्याचा आरोप स्थानिक नागरिक व युवक संघटनांनी केला आहे.
या प्रकरणातील अधिक गंभीर बाब म्हणजे २७ डिसेंबर २०२५ रोजी काम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र बांधकाम अद्याप अपूर्ण व दर्जाहीन असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून शासन निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोपही होत आहे.
“अपूर्ण कामाला पूर्ण दाखवून लाखो रुपयांची उचल झाली आहे. यामागे अधिकारी व कंत्राटदारांचे संगनमत आहे का?” असा सवाल युवा सेना शहर प्रमुख लकी महाराज चौबे यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे व अदा केलेली रक्कम वसूल करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. चौकशी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय राहते याकडे अचलपूरकरांचे लक्ष लागले आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी